Technology नमो नमः ----- ( E- मंगळागौर )

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Technology नमो नमः ----- ( E- मंगळागौर )

Avinash Deshpande
मागच्या वर्षी मुलाचे लग्न झाले व पाठोपाठ सून शिकागो, अमेरिका येथे रहायला गेली देखील. त्यामुळे नविन लग्न झालेल्या जोडप्याचे कौतुक करण्याचे, सणवार जोरदार साजरे करण्याचे बघितलेले स्वप्न काही प्रत्यक्षात आणता येणार नाही याची सतत खंत वाटत होती. सुनेकडील सर्व मंडळी अतिशय उत्साही आहेत. श्रावण महिन्यात इतर लोकांकडे मंगळागौरीची चाललेली लगबग बघून सुनेच्या धाकट्या आत्या-बाईंनी एक अभिनव कल्पना मांडली. आपण सुनेची इ-मंगळागौर करू या. झाले !. लगेच सर्वांनी कल्पना उचलून धरली. सर्वांच्या सोयीने २० ऑगस्ट २०१३ चा मंगळवार ठरला. आम्ही बायका या नवीन Technology ला एवढया सरावलेल्या नाही पण घरातल्या  मुलांची या कामी खूप मदत मिळाली ( तरुण भारत साक्षर भारत ! ) आणि एक नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम ( घरातील पुरुष मंडळीच्यासह ) आम्ही अनुभवला.

Google वर हल्ली बहुतेक सगळ्यांचे gmail account असते. त्यावर 'Hangout' ही Audio-Video chat करण्याची सोय आहे. या सोयीमुळे एकाच वेळी ७ ते ८ जण वेगवेगळ्या ठिकाणांहून एकमेकाला बघू शकतात व एकमेकांशी बोलूही शकतात.

ठरल्याप्रमाणे रात्री ९ वाजता ( भारतीय वेळ ) सगळे Computer सुरु करून 'Hangout' च्या द्वारे हजर झाले. तिकडे सुनेने आधी सांगितल्याप्रमाणे पुजेची शक्य तितकी सगळी तयारी करून - पुरणा, वरणाच्या नैवेद्यासह यथासांग व्यवस्था झाल्यावर शिकागो वेळेनुसार सकाळी १०. ३० वाजता 'Hangout' वर सगळ्यांना Invite पाठवले. ती ( सून ) स्वतः शिकागो ; आम्ही सासू-सासरे पुण्यात ; सुनेचे आई-वडील व भाऊ - कांदिवली ; मोठी आत्या, तिचे यजमान, तिची सासू व मुले - बोरीवली ; धाकटी आत्या, तिचे यजमान व मुलगी - गिरगाव ; मावशी, तिचे यजमान, सासू-सासरे व मुलगा - दादर ; काका-काकू व त्यांचा मुलगा - पनवेल असे  दाही  दिशांनी सगळे Computer वर अवतरले.

सगळी जुळवा-जुळव व्हायला १५-२० मिनिटे गेली. सगळे एका वेळेला बोलत असल्याने  सुरवातीला मजेशीर गोंधळ उडत होता. पण हळूहळू व्यवस्थित, शिस्तबद्ध कार्यक्रम सुरु झाला. हौशी महिला-मंडळाने नऊवारी, पाचवारी, जरीच्या साड्या, नथ, दागिने अशी मंगळागौरीचे वातावरण निर्मिती करणारी तयारी केली होती.

सुनेच्या दोन्ही  आत्यांनी मंगळागौरीची थोडक्यात पण खूप छान पूजा, कहाणी सांगितली. त्याप्रमाणे सुन तिकडे पुजा करित होती. हाताशी उपलब्ध नसलेल्या साहित्यासाठी 'अक्षतां समर्पयामी' असा थोडासा सोयीचा मामला चालला होता. त्यानंतर सगळ्याजणी आधीपासून तयार असलेले पूजेचे ताम्हन घेऊन उभ्या राहिल्या. निरांजन लावली व गणपतीची, शंकराची व मंगळागौरीची आरती केली. मनोभावे पूजा झाल्यावर मात्र मंगळागौरीचे खेळ, हास्य-विनोद यांना अक्षरशः  उधाण आले.

Computer Screen समोर दोन्ही आत्यांनी मुलींसोबत, सुनेच्या आईने मुलासोबत फुगड्या घालून दाखवल्या. उखाणे घ्या, नाव घ्या म्हणून गलका सुरु झाला. मोठ्या आत्याने जुन्या पद्धतीचा लांब-लचक उखाणा घेऊन 'राव बसले दारात तर कशी जाऊ घरात ?' असे म्हणून मजा आणली.
 "Arrange Marriage असले तरी प्रेम झाले Obvious,
  नवरा माझा Software आणि मी      आहे Anti Virus".
सुनेने असा आजच्या  Techno-savvy पिढीला शोभणारा उखाणा घेऊन टाळ्या मिळवल्या. सुनेच्या पनवेलच्या काकाने पण उत्फूर्तपणे उखाणा रचून लगेच म्हणून दाखवला व दाद मिळवली.

आम्ही उभ्याने पिंगा घातला -

"लेक तुझा ग, जावई माझा ग, खडूस आहे ग, कंजुष आहे    ग  पोरी पिंगा ग पोरी पिंगा"
"लेक तुझी ग, सुन माझी ग, आळशी आहे ग, दिवसा झोपते ग  पोरी पिंगा ग पोरी पिंगा"
( भारतात दिवस असतो तेंव्हा शिकागोत रात्र असते ना म्हणून ! )

अशी लुटूपुटुची भांडणे देखील केली. आमच्या या 'Hangout' मध्ये Join झालेले घरातील ८० किंवा ९० गाठलेले आजी-आजोबा मंडळींना या नवीन संकल्पना बघून व त्यात सामील होताना खूप मजा येत होती व आनंद ही वाटत होता.

तर  अशा सगळ्या गोंधळात, दंगा-मस्तीत रात्रीचे १२ वाजून गेले. म्हणून मग आवरते घेण्याचे ठरवले. दंगा करून सुनेला सडकून भुक लागली होती व सुनेच्या आत्येला व आईला दुसऱ्या दिवशी Office पण होते. त्यामुळे आणखी दंगा-मस्ती करायची इच्छा असतानाही आवरते घेतले.

याच दिवशी ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यात पुरोगामी विचारांचे महाराष्ट्रातील प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांना सर्वांनी मिळून भावपूर्ण आदरांजली वाहिली. " 'Technology' चा विजय असो" , या घोषणांनी कार्यक्रम संपविला.

हल्ली आपल्या सर्वांच्या घरामधील मुलं आपल्यापासून लांब ( काही परदेशी पण ) असतात. म्हणून आपण निराश न होता, नव्या गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून योग्य उपयोग करून घेतला तर छोट्या-छोट्या गोष्टी देखील सकारात्मक बळ वाढवतात, रोजच्या जगण्याला उत्साह देतात. आपल्या घरांपासून, देशापासून खूप दूर रहात असलेल्या मुलांना नात्यामधला ओलावा, उब, आपलेपणा व मायेची माणसे जवळच असल्याचे समाधान मिळत राहते.

म्हणूनच म्हणते - "Be +ve, Think +ve",  'Hangout' चा 'Hangover' असाच मिळत राहो आणि सरतेशेवटी "Technology नमो नमः".

- सौ. गौरी अविनाश देशपांडे.